कोल्हापूरच्या भूषण गगराणी व विकास खारगे अशा या दोन सुपुत्रांची राज्य शासनाच्या प्रधान सचिवपदी निवड झाली आहे. समस्त कोल्हापुरकरांनी याच गोष्टीचा निरनिराळ्या समाजमाध्यमांद्वारे आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून काम करण्याचा बहुमान या दोघांना एकाच वेळी मिळाला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी भूषण गगराणी यांची विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शासनाच्या कारभारात केलेल्या बदलांत, भूषण गगराणी व विकास खारगे यांची प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
गगराणी हे १९९०च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला गती दिली. विकास खारगे हे १९९४च्या आयएएस तुकडीचे अधिकारी आहेत. याआधी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.
कोल्हापुरात शिक्षण झालेले भूषण गगराणी तसेच इचलकरंजी येथे शिक्षण झालेले विकास खारगे या दोघांची प्रधान सचिवपदी निवड झाली आहे. प्राथमिक शिक्षण कोल्हापुर हायस्कूल येथे झाल्यानंतर त्यांनी न्यू कॉलेज येथून पदवी प्राप्त केली. यांनी महाराष्ट्र पर्यटन मंडळ, रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ या साऱ्या क्षेत्रांत त्यांनी काम केले आहे. १९९९ ते २००३ या कालावधीत ते मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असून वैद्यकीय शिक्षण तसेच सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सचिव पदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे.
इचलकरंजी येथे शिक्षण घेतलेले विकास खारगे १९९४ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी चंद्रपुर, नागपूर या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सचिव म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत असताना आधुनिकतेचा वापर करून राज्यात ५० कोटीहून अधिक वृक्ष लागवड केली. याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाला ‘अर्थ केअर’ या मानाच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.