गेल्या बऱ्याच दिवसांपासून चालू असलेल्या सत्तेच्या तांडवाचा तिढा एकदाचा सुटलाच म्हणावं लागेल,नाही का? राजकारणातली अनेक खलबतं पार पडल्यानंतर अखेर महाविकास आघाडीने सत्तेची खुर्ची संपादित केलीच म्हणायची…यात सध्याच्या तरुण पिढीने आयुष्यात पाहिलं नसेल एवढं राजकारण या काही काळात पाहिलं आहे. इथे सत्तेसाठी नेहमीच कुणाला तरी झुकावं लागतं तर कुणाला तरी ताठ मानेनं जगावं लागतं.
कुणाला तरी भर पावसात उभं राहून… “माझ्या तमाम बंधू- भगिनींनो…” असं म्हणत भाषणही द्यावं लागतं…
कुणाला तरी नक्की ठरलंय काय? हे कधीतरी सांगावंच लागतं…
कुणाला तरी जनतेचे आशिर्वाद घ्यायला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं…
कुणाला तरी असंख्य लोकांसमोर उभं राहून नकलांवर भाषण काढावं लागतं…
कुणाला तरी “आम्ही यात नव्हेच” असंही कधीतरी म्हणावं लागतं…
अखेर हे सारे राजकारणातील डाव!
कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार हा नियम ठरलेलाच!
संख्याबळाचा विचार करता भाजप म्हणजे महासत्ता! या महासत्तामय पक्षाने गेली काही वर्षे आपली सत्ता गाजवली. मेक इन इंडियासारख्या उपक्रमांमुळे जनतेचा विकास साधला. याच महासत्ता पक्षाला सत्तेबाहेर ठेवत आता “शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी” हे महाआघाडीतील पक्ष सत्तेवर येत आहेत. यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी झालेल्या चढाओढीत आता ठाकरे घराणे हा पदभार सांभाळणार असल्याचे निश्चित झाले आहे. याचसाठी आज शिवतीर्थ खऱ्या अर्थाने सजलंय… असं म्हणायला काही हरकत नाही.
शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आज शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. राज्यभरातील अनेक व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शिवसेनेच्या प्रथम मनोहर जोशी, यानंतर नारायण राणे, आणि आता तब्बल २० वर्षांनी शिवसेनकडून तिसरा मुख्यमंत्री म्हणून मा. उद्धवजी ठाकरे यांना सत्तेसाठी दिले जात आहे. यातच आणखी महत्वाची बातमी म्हणजे मा. उद्धवजी ठाकरेंनी सामनाचे संपादकपद सोडले आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी त्यांनी पदाचा कारभार सोडला आहे. यानंतर सामानाच्या संपादकपदी संजय राऊत यांची निवड होण्याची चर्चा होत आहे.
आता उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीमुळे महाराष्ट्र सत्तासंघर्षाला एक वेगळाच ट्विस्ट आला असून उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राच्या २९ व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. साक्षात बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाने गुंजलेल्या महाराष्ट्रावर आता ठाकरे घराण्याच्या उद्धवजी ठाकरेंचा आवाज घुमणार आहे.